जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केलेल्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या न जमावाने २० रोजी रात्री अचानक पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती. या प्रकरणातील २२ संशयित आरोपींना २५ रोजी ३ दुपारी ३ वाजता मुख्य न्यायाधीश डी. एन. चामले यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्वांची धुळे येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारही बाजूने पोलिसांचेकडे करून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यापासून ते न्यायालयापर्यंत सर्व संशयित आरोपींची पायी धिंड काढण्यात आली. या वेळी आरोपींच्या नातेवाईकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. तर पुन्हा काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पो.नि. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, तालुक्यातील एका गावात ११ जूनला ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या करून आरोपी सुभाष उमाजी भील हा फरार झाला होता. २० जून रोजी त्याला भुसावळ येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर अटक केलेल्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, या मागण्यासाठी त्याच दिवशी रात्री जामनेर पोलीस ठाण्यासमोर जमाव जमला होता. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यानंतर अचानक जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. यात पो.नि. किरण शिंदे यांच्यासह ८ ते १० पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानतंर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावर व मिळालेल्या माहितीनुसार संशयिताची धरपकड सुरू करून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना जामनेर येथील न्यायालयात हजर केले असता कालपर्यंत कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. ती संपल्यामुळे आरोपींना २५ रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायाधीश डी. एन. चामले यांनी या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
या घटनेतील मुख्य आरोपी हा मात्र फरार असून पोलिसांकडून चोर सोडून संन्याशाला शिक्षा दिली जात असल्याची खंत आरोपीच्या तेथे जमलेल्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात होती. तर संदर्भात या आधीच संशयित आरोपीच्या नातेवाईकांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्याकडे आपली कैफियत मांडली. तसेच शहरातील दैनंदिन व्यवहार शांततेत सुरळीत सुरू असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस स्टेशनच्यावतीने करण्यात आले आहे.