रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील केन्हाळे ते पिंपरी रस्त्यावरील जय भोले तोल काट्यावर केळीने भरून आणलेल्या ट्रकचा अग्रक्रम लावण्यावरून दोन्ही ट्रकवरील मजुरांच्या झालेल्या भांडणात अहिरवाडी येथील केळी मजुराने भोकरी येथील केळी मजुराच्या मानेवर विळ्याने दोन वार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रावेर पोलिसांत अहिरवाडी येथील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपींना सोमवारी रावेर न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. आरोपी विकी यशवंत वाघ रा. अहिरवाडी याने रियाज रफीक तडवी (१८, रा, भोकरी) याच्यावर वार केले. तत्पूर्वी आरोपी विकी वाघ याचे साथीदार गणेश देवीदास वाघ, विशाल खुशाल गोमटे, नितीन गोमटे, करण तायडे, सिद्धार्थ भालेराव व मंगल पाटील सर्व रा. अहिरवाडी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.