चाळीसगाव : प्रतिनिधी
येथे दि.२१ जून २०२४ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन समोर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, आप आदी महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीचा नेता व अनेक गुन्हे दाखल असलेला गुन्हेगारी प्रवृत्तीचा किसन जोर्वेकर यानेदेखील प्रक्षोभक असे भाषण केले. त्यात त्याने चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांना “माझ्या नादी लागशील तर पिस्तुल आणून गोळी घालून टाकेल रस्त्यावर” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे भाजपा महायुती तसेच चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने निषेध म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बारदान मध्ये बनवलेला किसन जोर्वेकर, माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांचा चेहरा असलेला पुतळा आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांनी जाळून निषेध केला. यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आठवले गट आदी महायुती चे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, तरुण, युवक विद्यार्थी,महिला व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
किसन जोर्वेकर याने हे वक्तव्य केले त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. आमदार मंगेशदादा चव्हाण यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा यातील अनेकांनी टाळ्या वाजविल्या तसेच हसून दाद दिली. घटनेला आता ४८ तास उलटले तरीदेखील या क्षणापर्यंत माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह तेथे उपस्थित एकानेही या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही याचा अर्थ त्यांची या वक्तव्याला मूकसंमती होती. लोकसभा निवडणुकीत आलेला पराभव जिव्हारी लागल्याने तसेच आमदार मंगेश चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे अशक्य वाटत असल्याने चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे माजी खासदार आमदार व पदाधिकारी नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे सदर धरणे आंदोलन हे पूर्वनियोजित कटाचा भाग असून त्यात मुद्दामहून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हाफ मर्डर, खंडणी, आदी अनेक गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तीला सहभागी केले गेले व त्यांना मुद्दामहून भाषण करण्याची संधी दिली गेली. म्हणून हा कट रचणाऱ्या उन्मेष पाटील, राजीव देशमुख, धरणे आंदोलन आयोजक राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेना उबाठा गट तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण व इतर आयोजक पदाधिकारी यांच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपा तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांनी पोलिसांकडे केली.
सुसंस्कृत चाळीसगावचे भवितव्य अंधारात नेण्याचे पाप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत
चाळीसगाव तालुक्याला सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती आहे. अनेकदा वैचारिक वाद झाले मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधी ला विरोध म्हणून गोळी मारून ठार करण्याची धमकी दिल्याचा हा निंदाजनक प्रकार प्रथमच घडला आहे. “मला कॅन्सर आहे, डायबेटीस आहे, माझे वय ७३ आहे मी आजच मेलेलो आहे त्यामुळे मी मरेल पण कुन्हाला तरी मारून मरेल” असे विकृत विचार असणारे पदाधिकारी, गुंड खंडणीखोर अश्या नेत्यांना पुढे करून माजी खासदार, माजी आमदार व महाविकास आघाडीवाले कुठला अजेंडा राबवत आहेत ? अश्या विकृती विचारांना टाळ्या वाजवून, हसून दाद देत मूक संमती देऊन चाळीसगावचे भविष्यातील अंधारात नेणार आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार मंगेशदादा चव्हाण यांना निवडणुकीत पराभूत करणे अशक्य वाटत असल्याने विरोधक महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी यांनी मुद्दामहून मतदारांमध्ये भीती व संभ्रम निर्माण करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने हे आंदोलन व विद्यमान आमदारांना जीवे ठार मारण्याचे वक्तव्य केले गेले आहे. या आंदोलनामुळे व प्रक्षोभक वक्तव्यामुळे दोन गटात, समाजात, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे सदर घटनेला ४८ तास उलटून देखील तसेच अगदी पोलीस स्टेशनच्या आवारात एका विद्यमान लोकप्रतिनिधीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन देखील पोलीस प्रशासनाने कुठलीही कायदेशीर कारवाई संबंधितांवर केली नाही. उपविभागीय दंडाधिकारी यांनीदेखील याची दखल घेतली नसल्याने स्थानिक प्रशासन सदर घटनेच्या अनुषंगाने उदासीन तसेच कुणालातरी घाबरून दबावाखाली असल्याचे स्पष्ट होते