जामनेर : प्रतिनिधी
तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भिल (वय ३५) या आरोपीला गुरुवारी पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना रात्रीच ताब्यात घेतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी संतप्त जमावाने दगडफेकही केली. त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीही जमाव शांत होत नव्हता, जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली, अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली.
जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड, मुकुंदा पाटील हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
भुसावळ शहरात सुभाष भिल यास भुसावळ पोलिसांनी झुगादेवी परिसर या भागातून गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. याची माहिती आदिवासी बांधवांना मिळतात त्यांनी इसका फैसला हम करेंगे अशी अशी भूमिका घेतली. आरोपीला ताब्यात द्यावे, यासाठी नाहाटा चौफुलीवर जमाव अनियंत्रित होऊ नये, म्हणून पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि भुसावळ नगरपालिकेचे अग्निशमन बंब जामनेरकडे गुरुवारी रात्री उशिरा रवाना झाले. आदिवासी समाजाला शांततेचे आवाहन करीत डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक गजानन पडघन, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.