अहमदनगर : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदार संघाची राज्यभर चर्चा सुरु असतांना नुकतेच नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटणार आहे असे विधान त्यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे तोंडभरून कौतुक करत त्यांचे आशीर्वादही घेणार असल्याचे म्हंटले आहे.
याबाबत बोलतांना नीलेश लंके म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीमध्ये मी ज्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीला उभा होतो. त्यांच्यावर आता टीका टिपण्णी करणे योग्य नाही. कारण आता लोकसभेचा निकाल लागला आहे. झाले गेले सोडून द्यायचे हे मी नुकतेच म्हंटले होते. विखे कुटुंबिय हे जिल्ह्यात मोठं कुटुंबिय असून त्यांचे सहकार क्षेत्रात मोठं काम आहे. निवडणूक लढवत असताना त्यांच्या विरोधात बोलणं योग्य आहे. निवडणुकीच्या प्रचारात बोलताना एखादा शब्द माझ्याकडून त्यांच्यावर घसरला असेल किंवा त्यांच्याकडून माझ्यावर घसरला असेल. पण आता तेच मनावर घेऊन बसायचं का?”, असे म्हणत नीलेश लंके यांनी नमती आहे.
पुढे नीलेश लंके यांनी मंत्री विखेंचे आशीर्वाद घेणार असल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले, ”आता जिल्ह्याचे पालकमंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील आहेत. मी सुद्धा त्यांना सांगेल की मला आशीर्वाद द्या. मीही त्यांच्याकडे एखादे काम घेऊन जाईल. मी हक्काने त्यांना बोलू शकतो. अशा पद्धतीचे राजकारण असले पाहिजे. आपण लहान माणसांनी लहान माणसासारखं वागलं पाहिजे”, असे नीलेश लंके स्पष्टपणे म्हणाले.