चाळीसगाव : प्रतिनिधी
प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीवर ब्लेडने वार करून तसेच डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला. याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक करण्यात आली आहे. ही थरारक घटना तालुक्यातील कोदगाव येथे बुधवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे पतीचा अपघाती मृत्यूच्या बनाव तिने केला आणि नंतर खुनाचा हा प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळू सिताराम पवार (३५, रा. गवळीवाडा, न्यायडोगंरी ता. नादंगाव, जि. नाशिक) असे या मृत इसमाचे नाव आहे. तो पत्नी वंदना पवार (३०) हिच्यासह न्यायडोंगरी येथे राहत होता. वंदना हिस बाळू हा दारु पिवून शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्यामुळे ती त्याच्या त्रासाला कंटाळली होती. तसेच तिचे व चुलत दिर गजानन राजेंद्र पवार (३२, रा. न्यायडोंगरी ता. नांदगांव जि. नाशिक) याच्याशी मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधातील पती बाळूचा अडथळा दूर करण्यासाठी वंदना हिने गजानन याच्यासोबत पतीला मारण्याचा कट रचला होता. त्याप्रमाणे वंदना व बाळू हे मंगळवार १८ रोजी चाळीसगाव येथे आले. बाळू यास गजानन याने दारु पाजली. सायंकाळी वंदना हिने आपणास माहेरी कन्नड येथे जायचे आहे, असे सांगत बाळू यास गजानन याच्या दुचाकीवर कोदगाव शिवारात नेले.
वंदना हिने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले. संशय येवू नये म्हणून मृतदेह ओढत नेऊन महामार्गावर टाकून दिला बाळूच्या खिशात आधारकार्ड ठेवले. यानंतर दोघे तेथून पसार झाले. दरम्यान, तुषार अनिल देसले (रा. कोदगांव, ता. चाळीसगाव) यांनी १८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसात अपघाताची माहिती दिली. त्यावरुन चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सपोनि सागर ढिकले यांनी फिर्याद दिली. त्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे