मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होणार आहे. लोकसभा निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आमदारांची जमावजमव सुरू केली आहे. त्यामुळे आमदारांच्या मतांच्या फाटाफुटीचा धोका सर्व पक्षांना असल्याने विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मंगळवारी निवडणूक जाहीर केली या ११ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया २५ जूनला सुरू होणार आहे, तर २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३ जुलै रोजी अर्जाची छानणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ५ जुलै रोजी आहे, तर प्रत्यक्ष मतदान हे १२ जुलै रोजी होणार आहे. १२ जुलै (शुक्रवार) रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार असून, मतमोजणी १२ जुलै रोजीच होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
लोकसभेच्या ४८ जागापैकी महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या, तर महायुतीने १६ जागांवर विजय मिळवला. राज्यातील दोन प्रादेक्षिक पक्ष फोडणाऱ्या भाजपला मतदारांनी जोरदार दणका दिला. आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने महायुतीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. अशातच विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांची चांगलीच धावपळ उडाली आहे. भाजपने पराभवाचा वचपा काढण्यासाठी कंबर कसली आहे, तर महाविकास आघाडीने महायुतीतील आमदार संपर्कात असल्याचा दावा करत, राजकीय वातावरण तापवले आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान होते. विधानसभेसाठी उमेदवारी पक्की करण्याकरता बंडाच्या पवित्र्यात असलेल्या आमदारांनी विरोधकांना मतदानाची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न महायुती आणि आघाडीकडून होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही अखेरची संधी असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.