लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शिरकाव थेट जळगाव जिल्हा कारागृहात झाला असून १३ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व कैद्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मोहाडी येथील कोवीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात आज एकुण २८५ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यात जळगाव शहर, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव या ठिकाणी संसर्ग वाढत आहे. जिल्हा कारागृहामध्ये देखील काही कैद्यांना कोरोना आजाराची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जिल्हा कारागृह प्रशासनाने त्यांचे नमुने देऊन तपासणी करून घेतली होती.
त्यात १३ जणांचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यांची प्राथमिक तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आली तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करीत सर्व १३ कैद्यांना मोहाडी येथील कोविड रूग्णालयात पुढील उपचारासाठी संदर्भित केले. त्यामुळे आता जिल्हा कारागृहात १३ कैदी आढळून आल्याने सर्व कैद्यांची स्वॅब घेण्यास सुरूवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.