चोपडा : प्रतिनिधी
अवैध पध्दतीने गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वैजापूर ते बोरअजंटी रस्त्यादरम्यान चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाइ केली. या वेळी पिस्तूल, काडतूस, दुचाकी, मोबाइल असा जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १७ रोजी ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहरापासून १८ किमी अंतरावरील गावठी तेल्या घाटातून तुषार हनुमंत पवार (वय २०) व भरत सुखदेव जायगुडे (वय२२) हे दोघे दोन गावठी कट्टे नेताना पोलिसांनी त्यांना मध्यरात्री पकडले. हे दोघे आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जामवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्याजवळील ५० हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे, चार हजार रुपये किमतीचे चार जिवंत काडतुसे, २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल, ३० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि तीनशे रुपये रोख असा एकूण एक लाख चार हजार तीनशे रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल रावसाहेब एकनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.