मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत असा आरोप अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी केला आहे. तसेच अजित पवार गटात मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत बोलतांना सुनील तटकरे यांनी या चर्चा अफवा असल्याचे म्हंटले आहे. सुनील तटकरे हे नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
ओबीसी आरक्षणामुळे मंत्री छगन भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
याबाबत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत चर्चा करून त्यांचे निराकरण झाले. त्यानंतर राज्यसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना छगन भुजबळ यांनी आशीर्वादही दिले. भुजबळ नाराज नाहीत. ते पक्ष सोडून जाणार असल्याच्या केवळ अफवा आहेत”, असे स्पष्ट केले आहे.
पुढे बोलतांना तटकरे म्हणाले की, ”या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाबद्दल केलेला अपप्रचार, अल्पसंख्यांक समाजाबद्दल असुरक्षितता निर्माण करण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळे देशात आणि राज्यात एनडीए पिछाडीवर जाण्याच कारण ठरले आहेत. काही मतदारसंघात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत. तरीही युतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. त्याबाबत आम्ही सविस्तर अहवाल पाहून विश्लेषण करू. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी असलेल्या ठिकाणी भाजपच्या लोकप्रतिनिधींना आघाडी मिळाली आहे. मात्र अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत”, असा आरोप तटकरे यांनी केला आहे.