मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई पद भरती २०२२-२३ प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. १९ जूनपासून ही भरती प्रक्रिया आयुक्तालये आणि जिल्हा पातळीवर सुरू करण्यात येणार आहे. राज्य पोलीस दलात १७ हजार ४७१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली असून यासाठी तब्बल १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले असल्याची माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस भरती प्रक्रियेत सर्वाधिक नऊ हजार ५९५ पोलीस शिपाई पदे असून यासाठी आठ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल राज्य राखीव पोलीस बलात चार हजार ३४९ पोलीस शिपाई पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी तीन लाख ५० हजार ५९२ अर्ज आले आहेत. कारागृह शिपाईची एक हजार ८०० पदे भरण्यात येत असून यासाठी तीन लाख ७२ हजार ३५४ अर्ज आले आहेत. पोलीस शिपाई चालक पदासाठी एक हजार ६८६ पदे भरण्यात येत असून यासाठी एक लाख ९८ हजार ३०० अर्ज दाखल झाले आहेत. पोलीस बँडसाठी ४१ पदे भरण्यात येत असून यासाठी ३२ हजार २६ अर्ज आले आहेत.
ज्या ठिकाणी पाऊस पडत असेल त्या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवली जाईल. ती भरती प्रक्रिया दुसऱ्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी घेतली जाईल. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असेही व्हटकर यांनी सांगितले.