रावेर : प्रतिनिधी
घरात परिवार असताना दारू पिण्यासाठी चार-पाच सवंगडी आणून गोंधळ कशाला घालताय? असे हटकल्याचा राग आल्याने काकाने पुतण्यावर चाकूचे चार-पाच वार केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी काकाला अटक करण्यात आली. रावेर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सुभाष उर्फ बाळू गोविंदा महाजन (वय ६०, रा. हनुमान व्यायामशाळेजवळ, रावेर) हे त्यांच्या घरी चार पाच मित्रांना आणून दारू पीत होते. घरात परिवार असताना दारूच्या नशेतील त्या चार पाचही जणांचा गोंधळ पाहून शेजार राहणारा पुतण्या रवींद्र प्रल्हाद महाजन (वय ४०) हा काकाला बोलला, ‘तुम्ही घरी दारू प्यायला यांना का आणले?’ या बोलण्याचे वाईट वाटून काका सुभाष उर्फ बाळू याने घरातून चाकू आणून पुतण्या रवींद्रवर हल्ला चढवला. रवींद्रच्या छातीवर चाकूचा पहिला वार करताच रवींद्र हा जखमी होऊन खाली कोसळल्याने सुभाषने पुन्हा तीन-चार वार केले. यावेळी कुटुंबीयांनी आवर घालून गंभीर जखमी झालेल्या रवींद्र यास रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी रावेर पोलिसांत आरोपी सुभाष उर्फ बाळूविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.