मुंबई : वृत्तसंस्था
अरे छोड यार’ या यूट्युब चॅनलवर अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याचा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला दक्षिण सायबर पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. बनवारीलाल लातुरलाल गुजर असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील फाजलपुरा, बोर्डा गावातील रहिवासी असलेल्या गुजर याने येथील एका द्रुतगती महामार्गावर एक व्हिडीओ बनवला. यात त्याने सलमान खानच्या हत्येबाबत खुलासा करत कख्यात गैंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावांचा उल्लेख केला. हा व्हिडीओ त्याने ‘अरे छोड यार’ या यूट्युब चॅनलवर अपलोड केला. याची माहिती मिळताच दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०६ (२), ५०४ आणि ३४ यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपी गुजर हा राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळताच सायबर पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले. या पथकाने गुजरला ताब्यात घेत अटक केली असून त्याला मुंबईत आणण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.