जामनेर : प्रतिनिधी
कर्जाची रक्कम वसूल करून परतणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील दोन लाखांची रक्कम लुटून नेली. ही घटना पळासखेडे काकर ते देऊळगाव गुजरी (ता. जामनेर) दरम्यान १२ जून रोजी घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध फत्तेपूर पोलिस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नीलेश राधेशाम यादव (रा. पिपलीय कायथा, जि. उज्जैन) हे जामनेर येथील नम्र फायनान्स कंपनीत शाखा व्यवस्थापक आहेत. ते दीपक सुरडकर यांच्यासोबत १२ जून रोजी महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी दुचाकीने पळासखेडे काकर (ता. जामनेर) येथे गेले होते. वसूल झालेली सुमारे २ लाख ७ हजारांची रक्कम घेऊन ते सायंकाळच्या सुमारास देऊळगाव गुजरीकडे येत होते. त्याचवेळी रस्त्यातील नाल्याजवळ समोरून दोन दुचाकींवरून सहा जण आले. एका दुचाकीस्वाराने दीपक सुरडकर यांना धक्का मारल्याने यादव व सुरडकर दोघेही खाली पडले. इतरांनी त्यांची दुचाकी आडवी लावत असताना यादव यांची गाडी नाल्यात पडली. इतर तिघांनी पैशांची बॅग हिसकावून घेतली व दोघांना मारहाण केली.
यादव व सुरडकर यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर दगड फेकण्यात आले. त्यानंतर संशयित कापूसवाडीच्या दिशेने पसार झाले, असे यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून फत्तेपूर पोलिस ठाण्यात अज्ञात सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गणेश फड हे पुढील तपास करत आहेत.