जालना : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. याच दरम्यान जरांगे पाटील यांनी एक गंभीर आरोप केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलनाच्या नावाखाली तब्बल 100 कोटी उकळल्याचा संशय मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी थेट शंभूराज देसाईंकडेच चौकशीची मागणी केली आहे.
माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि कामं घेतली त्याची मला यादी द्या, अशी मागणी जरांगेंनी शिष्टमंडळाकडे केली आहे. दरम्यान, माझ्या कानावर 100 कोटींचा आकडा आलाय. वेळ आल्यावर त्या माणसाचं नावही घेणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला, त्यामुळे नेमके 100 कोटी कुणी कमावलेत या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेलं जरांगेंचं उपोषण त्यांनी मागे घेतलं आहे. राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी आणि मराठा आरक्षणावर निर्णय घ्यायला एक महिना वेळ द्यावा अशी विनवणी यावेळी शंभुराज देसाई यांनी केली.
जरांगेंनी देसाईंची विनंती मान्य करत सरकारला 13 जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसंबंधी सरकारची मानसिकता नाही हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं, शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिला आहे, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं. मात्र, जर सरकारने एक महिन्याच्या आत मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभा लढणार असल्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.