चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील अडावद येथे गेल्या काही दिवसांत अडावद शहरासह परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पाटचारी भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीला गेलेल्या तब्बल ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. याच संशयिताचा घरफोड्यांमध्येही सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सप्टेंबर २०२२ मध्ये चोरी झालेली दुचाकी पाटचारी भागात राहणाऱ्या तरुणाकडे असल्याची गुप्त माहिती सपोनि संतोष चव्हाण यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अडावद परिसर पिंजून काढला; परंतु संशयित हाती लागला नाही. अधिक शोध घेतला असता तो जंगल रस्त्याने उनपदेवच्या जंगलात पसार झाला.
पोलिसांनी सुमारे ५ ते ७ किलोमीटर पाठलाग करत सुनील उर्फ दाद्या सूरसिंग बारेला (२४, रा. पाटचारी, अडावद) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या तब्बल ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या त्याचा घरफोड्यांमध्येही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुध्द ९ गुन्हे दाखल असल्याची माहिती अडावद पोलिसांनी दिली आहे.
या तपासकामी सपोनि संतोष चव्हाण, पोउनि राजू थोरात, शरीफ तडवी, किरण शिरसाठ, नासीर तडवी, ज्ञानेश्वर सपकाळे, जयदीप राजपूत, भांगडा बारेला, भरत नाईक, फिरोज तडवी, मुकेश तडवी, सतीश भोई, शुभम बाविस्कर, अक्षय पाटील यांनी परिश्रम घेतले. अधिक तपास अडावद पोलिस करत आहेत.