जामनेर : प्रतिनिधी
एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला ठार मारण्यात आले. या प्रकरणी सुभाष उमाजी भिल (३५) या संशयित आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची १० पथके तालुक्यासह वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली आहेत. संशयितास पकडून देणाऱ्यास पोलिसांतर्फे बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, या बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याने गुन्ह्यातील कलम वाढविण्यात आले आहे.
दरम्यान, मृत बालिकेच्या शवविच्छेदन अहवालावरून संशयित आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी संशयित भिल याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. त्याचा ठावठिकाणा कळविणाऱ्यास किंवा पकडून देणाऱ्यास बक्षीस दिले जाईल, असे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी जाहीर केले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी सकाळी या गावाला भेट दिली व तपासाची माहिती घेतली.
शेतमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील सहावर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून अत्याचार व नंतर जीवे ठार मारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. संशयिताला तातडीने अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. सामाजिक व राजकीय संघटनांकडून घटनेचा निषेध केला जात आहे. मुलीचे आई, वडील हे कामानिमित्त या गावात वास्तव्यास आले आहेत. संशयिताचे घरदेखील त्यांच्या घराजवळच आहे. घटना घडली तेव्हापासून संशयित हा फरार आहे. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली. मात्र अद्याप पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.