मुंबई : वृत्तसंस्था
नुकतेच लोकसभा निवडणुकी मोठ्या उत्साहात झाली, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे. या निवडणुकीत मनसेने देखील भाजपला पाठींबा दिला होता मात्र आता मनसे विधानसभेच्या तयारीला लागली असून आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनासाठी मनसेने विधानसभेसाठीची ही पहिली घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची राज्य व्यापी बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीत 200 ते 225 जागा लढण्याची घोषणा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाने मतदान केले नसल्याचे राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सांगितले. तसेच विधानसभेसाठी मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये दिली आहे. मी कोणाकडे जागा मागणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केले. महायुतीसोबत जाणार की नाही? यावर मनसेचा निर्णय अद्याप झालेला नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या वतीने तूर्तास स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्वच जागांवर तयारी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. मतदार संघनिहाय आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती राज्यभरातील मतदार संघाचा आढावा घेणार आहे. तसेच लवकरात लवकर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देखील राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये दिल्या आहेत. युती किंवा आघाडीबाबत पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊ नये, असे निर्देश देखील राज ठाकरे यांनी दिले आहेत.