मुंबई वृत्तसंस्था । ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी एका विद्यार्थ्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. आपण दुकान चालवून कोरोनाचे सर्व नियम पाळणार असल्याचेही देखील पत्रात नमूद केलं आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात शिक्षण घेत असणारा विद्यार्थी पवन जगडमवार असे विद्यार्थ्याचं नाव आहे. “ऑनलाइन शिक्षण लादले जात आहे. ऑनलाइन वर्गात ४० विद्यार्थ्यांची संख्या असेल तर आठ ते दहाच विद्यार्थी त्यावर उपस्थित असतात. बाकी विद्यार्थ्यांनाकडे चांगले मोबाइल नाहीत. ग्रामीण भागात इंटरनेट सेवाही नीट नाही. अनेक ठिकाणी नेटवर्कच येत नाही. कधी लाईटच नसते. अशा स्थितीमध्ये शिक्षण कसे घ्यायचे?,” असा प्रश्न जगडमवार याने उपस्थित केला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसानही होत आहे.
करोना, ओमायक्रॉनचा प्रसार वाढत असल्याने राज्यातील शाळा, कॉलेज, विद्यापीठ बंद ठेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. दारू दुकाने मात्र निर्धास्तपणे सुरू आहेत. करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन ऑफलाइन शिक्षण घ्यायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना मिळावा अशी मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.