जळगाव : प्रतिनिधी
बैलगाडी घेवून शेतात जात असलेल्या शेतक-याला रेल्वेच्या बोगद्यामध्ये साचलेल्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे शेतकऱ्याने पाण्यात बैलगाडी टाकली, परंतु पाणी दहा ते बारा फुट असल्यामुळे शेतकऱ्याने बैलाची सुटका केली. मात्र सुकलाल लालचंद माळी (वय ६३, रा. असोदा, ता. जळगाव) यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता असोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याजवळ घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रेल्वे बोगद्याजवळ ठिय्या आंदोलन केले,
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आसोदा गावात सुकलाल लालचंद माळी हे आपल्या पत्नी, मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सुकलाल माळी हे नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजेच्या सुमारास बैलगाडीने मन्यारखेडा रस्त्यावरील शेतात जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान त्यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेचा बोगदा असून त्याची उंची सुमारे पंधरा फुट इतकी आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या बोगद्यात सुमारे दहा ते बारा फुटापर्यंत पाणी साचलेले होते. पलीकडे जाण्यासाठी सुकलाल माळी यांनी बैलगाडी बोगद्याखालून टाकली. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह सुकलाल माळी हे पाण्यात बुडू लागले, गावातील शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी घटनेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घेऊन मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत किंवा नोकरी द्यावी, अशी मागणी लावून धरली.
बैल गाडी घेवून सुकलाल माळी हे पाण्यात बुडत असल्याचे बोगद्याच्या शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्याठिकाणी घाव घेतली. परंतु तो पर्यंत माळी यांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला होता. घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांसह पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यातून दुपारी माळी यांचा मृतदेह बाहेर काढला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुकलाल माळी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माळी यांच्या पश्चात पत्नी मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात होती.