मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपवण्याच्या चर्चेमुळे महायुतीला फटका बसला. अशातच कांद्याने रडवले, सोयाबीन, कापसाच्या उतरलेल्या दराचाही मतदानावर परिणाम झाला, अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली.
शेतपिकासाठी किमान आधारभूत किंमत निश्चिती करण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आणि किंमत आयोगाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही कबुली दिली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीची चर्चा घडवून आणल्याने फटका बसला. राज्यातील संविधान बदलाचा अपप्रचार, आरक्षण संपवण्याची चर्चा आदींमुळे महायुतीला मोठा फटका बसला. अनेक जागा यामुळे गमवाव्या लागल्या. ४०० पार या घोषणेमुळे काहीतरी गडबड होईल, या भीतीने लोकांनी एनडीएला मतदान केले नाही. शिवाय राज्यातील शेतकऱ्यांनीही विरोधात मत दिल्याचे शिंदे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत कांद्याने आम्हाला रडवले. मुख्यतः नाशिक पट्ट्यात मोठा फटका बसला. मराठवाडा आणि विदर्भात कपाशी याच्यामुळे त्रास झाला. तसेच सोयाबीन, कपाशी आणि कांदा यांच्या निर्यातीवर आम्ही पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. कपाशीला किमान आधारभूत किंमत तरी मिळाली पाहिजे, अशी भूमिका घेतल्याचे शिंदे यांनी सांगत बाजू मांडण्याचा प्रयत्न यावेळी केला.
एका शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. वेळ मिळेल तेव्हा मूळ गावी साताऱ्यात जाऊन शेती करतो. माझे आपोआप शेतीकडे पाय वळतात. काही लोक टीका करतात. हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती करतो. परंतु गाडीतून गेलो तर ८ ते १० तास लागतील. या वेळेत कित्येक फाईलवर स्वाक्षरी करेन, असा टोला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला. तसेच टीकाकारांना उत्तर देत नसल्याचे ते म्हणाले.