पुणे : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. एनडीएला बहुमत मिळाले. पण अनेक राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या. यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. राज्यातील ४८ पैकी केवळ १७ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. विनोद तावडे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदी अत्यंत चांगलं काम केलं आहे. त्यामुळे लवकरच त्यांना मोठी संधी दिली जाऊ शकते, असं सूचक विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. पक्ष चालवण्यासाठी तावडे यांची भूमिका मोठी आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
निवडणुकीत बसलेल्या या फटक्यामुळे आता भाजपचे बैठकीचे सत्र सुरू झाले आहे. सध्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या बैठका सुरू असून अनेक राज्यांमधील नेतृत्वात मोठे बदल केले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. अशातच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाने महाराष्ट्र भाजपमध्ये काही बदल होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
उच्च शिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहे. आज कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरात चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांची हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी विनोद तावडे यांचं तोंडभरून कौतुक केलं. “विनोद तावडे हे पक्षाच्या सरचिटणीस पदापासून काम करत आहेत. त्यांच्यावर जी जबाबदारी आजपर्यंत दिली ती त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांना पक्षात आता मोठी संधी दिली जाऊ शकते”.
ती संधी सुद्धा ते यशस्वीपणे पार पाडतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधला. युती तोडून उद्धव ठाकरेंनी काय मिळवलं १८ जागांवरून त्यांच्या ९ जागा आल्या. याशिवाय अल्पसंख्याकांच्या जीवावर निवडून आले हा ठपका त्यांच्यावर आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.