जळगाव : प्रतिनिधी
भाडेतत्त्वावर ठरवलेली रिक्षा रद्द केल्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने संजय पुनीलाल ठाकूर (४८, रा. मोहननगर) या शिक्षकास मारहाण केली. यामध्ये लाकडी फळी, वीट डोक्यात मारल्याने शिक्षकाला दुखापत झाली असून त्यांची सोन्याची चेन व चष्मा तोडला. ही घटना रेल्वेस्थानकानजीक रिक्षा थांब्यावर रविवार, ९ जून रोजी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय ठाकूर यांच्या काकांचे सोमवार, १० जून रोजी उत्तरकार्य असल्याने रविवारी रात्री ठाकूर यांच्या बहीण व मेहुणे हे रेल्वेने जळगावात आले. त्यांना घेण्यासाठी ठाकूर रेल्वेस्थानकावर गेले होते. तेथे रिक्षा शोधत असताना एक रिक्षा (एमएच १९ व्ही ९४७३) ठरविली. मात्र, बहीण व मेहुणेही रिक्षा पाहत असल्याने ठरविलेली रिक्षा रद्द केली. त्यातून रिक्षाचालक राहुल (पूर्ण नाव समजू शकले नाही) वाद घालू लागला व त्याने शिवीगाळ करत ठाकूर यांना मारहाण केली, तसेच लाकडी फळी व वीट डोक्यात मारल्याने त्यांना दुखापत झाली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व चष्मा तोडून जिवे मारण्याची धमकी दिली. ठाकूर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रिक्षाचालक राहुल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दिलीप पाटील करीत आहेत.