रावेर : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील भांडणाच्या गुन्ह्यात आरोपी असलेले पती पत्नी पोलिसांच्या चौकशीसाठी मध्य प्रदेशात जात होते. मात्र, त्या दरम्यान दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. त्यात पतीचा मृतदेह निंभोरासीम शिवारात, तर पत्नीचा मृतदेह रसलपूर शिवारात आढळून आल्याने दोघांच्याही मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पत्नीचा मृतदेह पाल रस्त्यावर सोमवारी सकाळी आढळून आला. तर तिच्या पतीचा मृतदेह निंभोरासीम येथे झाडाला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पतीचे नाव सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण (वय ४४) तर पत्नीचे नाव प्यारीबाई (वय ४२) रा. बेलखेडा, जि. खरगोन असे आहे. या दोघांचाही मृत्यू दोन दिवस आधी झाल्याचा अंदाज आहे.
शवविच्छेदनात खुनाचे कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून न आल्याने दोघांचा मृत्यू गळफास आवळून झाल्याचा प्रथमदर्शनी अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला. त्यामुळे रावेर व निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद कायम करण्यात आली आहे. हे दाम्पत्य रहेगाव, ता. मुक्ताईनगर येथून बेलखेडा येथे जात होते. काही दिवस आधी बेलखेडा येथे एकाला मारहाण झाली. त्यात दोघेही आरोपी होते.
चौकशीसाठी मध्य प्रदेशातील धुलकोट पोलिस ठाण्यात त्यांना बोलवण्यात आले होते. यात सुकलाल याचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत, तर प्यारीबाई हिचा मृतदेह पाल-रसलपूर रस्त्यावर केळीच्या बागेत आढळून आला. गुन्ह्यात आरोपी असल्याने पती- पत्नीत वाद होऊन आधी पत्नीने आणि नंतर पतीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुढील तपास रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार घनश्याम तांबे आणि निंभोरा पोलिसात सहायक पोलीस निरीक्षक हरदास बोचरे यांचे नेतृत्वाखाली तपास सरू आहे.