यावल : प्रतिनिधी
शहरात नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या मागे जानकीराम शिवदास भिल (वय ३५) हा तरुण काही दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला होता. ९ जून रोजी सकाळी यावल शेतशिवारात किरण चिंधू बोरोले यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळला. दुर्गंधी येत असल्याने शेतमजुरांनी शेतात जाऊन पाहिले तर जानकीराम भिल याचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत दिसला.
याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी सहायक फौजदार विजय पासपोळ, हवालदार उमेश सानप, वसीम तडवी, मोहन तायडे हे दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांना आणून विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात विश्वनाथ भिल यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार उमेश सानप करीत आहे.