जळगाव : प्रतिनिधी
पत्नीला पळवून नेल्याचा राग मनात धरून तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना हलखेडा (ता. मुक्ताईनगर) येथे शनिवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जॉधनखेडा येथील रोहिदास राठोड याने राहुल लवंग चव्हाण (रा. लालगोटा, ता. मुक्ताईनगर) याच्या पत्नीस पळवून नेले होते. त्याचा राग राहुल याच्या मनात होता. शनिवारी दि. ८ रोजी रोहिदास हा राहुल चव्हाण याला दिसला. तेव्हा त्याने रोहिदास याला पकडून हलखेडा येथील नरलाल पवार याच्या घरासमोर ओढत नेले आणि त्याच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रोहिदास राठोड हा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली.
माहिती मिळताच कुन्हा पोलिस चौकीचे सहायक फौजदार संतोष चौधरी, पो.ना. प्रदीप इंगळे, हरीश गवळी, गोपीचंद सोनवणे, सागर सावे, राहुल नावकर, अनिल देवरे हे घटनास्थळी पोहोचले. रोहिदास याला गंभीर अवस्थेत मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच हल्ला करणाऱ्या राहुल लवंग चव्हाण यांच्या मुसक्या आवळल्या. संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप दूनगहू पुढील तपास करत आहेत.