नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जुन्या संसदेच्या (संविधान सदन) सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले आहेत. त्यात एनडीएचे सर्व 293 खासदार, राज्यसभा खासदार आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. अमित शहा यांनी पाठिंबा दिला आणि नितीन गडकरींनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. जेडीएसचे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले.
सविस्तर वृत्त असे कि, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक संपल्यानंतर आघाडीचे नेते आजच सरकार स्थापनेचा दावा करतील. 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. मोदींसोबत संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेऊ शकते, अशी बातमी आहे. एनडीएची पहिली बैठक ५ जून रोजी दुपारी ४ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. एक तास चाललेल्या या बैठकीत 16 पक्षांचे 21 नेते उपस्थित होते. सर्वांनी मोदींना एनडीएचे नेते म्हणून निवडले होते. मात्र आज होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींची अधिकृतपणे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली.
लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा (272) ही संख्या 32 कमी आहे. मात्र, एनडीएने 293 जागांसह बहुमताचा आकडा पार केला. एनडीएकडे भाजपशिवाय 14 मित्रपक्षांचे 53 खासदार आहेत. चंद्राबाबूंचा टीडीपी 16 जागांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि नितीश यांचा जेडीयू 12 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. यावेळी भाजपसाठी दोन्ही पक्ष आवश्यक आहेत. त्यांच्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करणे अवघड आहे.