मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या तयारीत असून त्यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन उपोषणाला परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. त्यानंतर आता आणखी दोन गावातील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. मात्र आता त्यांच्या या आंदोलनाला नागरिकांचा विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंतरवाली सराटीनंतर आता वडीगोद्री आणि दोडगाव येथील नागरिकांनी देखील जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी देऊ नये अशी मागणी या गावकऱ्यांनी अंबड तहसीलदारांकडे केली आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे त्रास होत असल्याचं ग्रामस्थानी म्हटलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठं आंदोलन उभारलं, या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी ते चार जूनपासून उपोषणाला बसणार होते. मात्र अचारसहिंतेमुळे त्यांनी आपलं आंदोलन पुढे ढकललं. आता ते उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत. मात्र पोलिसांनी त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.