जळगाव : प्रतिनिधी
देशातील सर्वच पक्षांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देवून संधी दिली होती यातील चार उमेदवार कॉंग्रेस पक्षाकडून रिंगणात होत्या. मात्र या १७ महिलांपैकी केवळ सात महिलांना विजयी होऊन आता लोकसभेची दारे खुली झाली आहेत.
विजयी उमेदवारांमध्ये सगळ्यात प्रमुख नाव आहे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांचे बंधु अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभूत केले. सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पवार कुटुंबातील दोन सदस्य प्रथमच परस्परांच्या विरोधात रिंगणात उतरले होते.
भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ आणि रक्षा खडसे या अन्य दोन उमेदवार अनुक्रमे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघांतून विजयी झाल्या आहेत. रक्षा खडसे यांनी २,८७,१८३ मतांनी विजय मिळवला तर वाघ यांनी २,५१,५९४ मतांनी त्यांच्या विरोधी उमेदवाराचा पराभव केला.
कॉंग्रेस पक्षाकडून प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड यांच्यासह चार महिलांना संधी देण्यात आली होती. गायकवाड आणि शिंदे या दोघींनी निवडणूक जिंकली आहे. प्रणिती शिंदे या राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत तर सोलापूरातील विद्यमान आमदारही आहेत. त्यांनी भाजपचे राम सातपुते यांचा ७४,१९७ मतांनी पराभव केला.
तर वर्षा गायकवाड कॉंग्रेसकडून धारावीच्या आमदार आहेत. त्यांनी प्रख्यात वकिल उज्ज्वल निकम यांचा १६,५१४ मतांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पराभव केला. वरोरा येथील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला.
त्यांच्या पतीने २०१९ ते २०२३ पर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. धानोरकर यांनी २,६०,४०६ एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. कॉंग्रेसच्या आणखी एक उमेदवार डॉ. शोभा बच्छाव उत्तर महाराष्ट्रातील धुळे मतदार संघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा ३,८३१ मतांनी पराभव केला.