जळगाव : प्रतिनिधी
रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे या लोकसभेच्या निवडणुकीत तिसर्यांदा खासदार होवून विजयी झाल्या आहेत. खासदार खडसे यांना सहा लाख तीन 30 हजार 879 मते मिळाली असून प्रतिस्पर्धी श्रीराम पाटील यांना तीन लाख 58 हजार 696 मते मिळाली. दोन लाख 72 हजार 182 मतांनी खासदार खडसे यांचा विजय झाला आहे. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार खडसे यांना सहा लाख 55 हजार 386 मते मिळाली होती तर प्रतिस्पर्धी उल्हास पाटील यांना तीन लाख 18 हजार 740 मते मिळाली होती. त्यावेळी खासदार खडसे यांनी डॉ.पाटील यांचा तीन लाख 35 हजार 882 मतांनी पराभव केला होता.
जळगावसह रावेरात मिळालेल्या यशानंतर जळगावातील जी.एम.फाउंडेशनच्या कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात बेभान होवून नृत्याला सुरूवात केली आहे. दोन्ही जागांवर यशाचे शिलेदार हे मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण ठरले आहेत.
रावेर लोकसभा मतदार संघात एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना यावेळी उमेदवारी मिळणार की नाही यावरून संभ्रम होता मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातून बंड उभे राहिले. नाराजांची मनधरणी करताना पक्षश्रेष्ठींची दमछाक झाली मात्र खासदार रक्षा खडसे यांचा मतदार संघात दांडगा संपर्क तसेच त्यांनी केलेली कामे तसेच मोदींना जनतेची असलेली पसंती या बळावर खासदार निवडून आल्या. दरम्यान, रावेर लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय पहिले असता सर्वाधिक मतदान हे मलकापूर विधानसभा क्षेत्रात झाले आहे. भुसावळ मतदार संघात सर्वांत कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र रावेर लोकसभा मतदार संघात लेवा पाटीदार समाज हा मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा फायदा निश्चितच रक्षा खडसे यांना झाला असल्याने रक्षा खडसे चांगल्या मताधिक्यांनी विजय मिळविला.