पुणे : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीला जोरदार धक्का बसत असल्याचे चित्र समोर येत असतांना पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेमध्ये अस्वस्थ असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी केली. परंतु तो प्रयोग यशस्वी होत नसल्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची साथ धरली आणि लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. परंतु या रिंगणात पुणेकरांची पसंत वसंत मोरे ठरु शकले नाही. पुणेकरांनी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनाच साथ दिल्याचे सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या कलावरुन दिसूत येत आहे.
वसंत मोरे यांनी कोरोना काळात पुणेकरांसाठी जबरदस्त काम केले. पुणेकर त्यांना हक्काचा माणूस म्हणून कधी फोन करतात. लोकांच्या प्रश्नांना दाद सोशल मीडियातून ते मिळवून देतात. त्यामुळे सोशल मीडियातील या हिरोला प्रत्यक्षात पुणेकरांनी साथ दिली नाही. सकाळी ११.३० वाजता भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना ८६ हजार मते मिळाली होती. परंतु वसंत मोरे यांना फक्त नऊ हजार मते होते. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ७८ हजार मतांसह स्पर्धेत होते. निवडणुकीच्या कलावरुन वसंत मोरे यांचे डिपॉझिट जप्त होण्याची भीती आहे.