नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून जाहीर होणार आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे अभिनंदन केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही 642 दशलक्ष मतदारांचा जागतिक विक्रम केला आहे. ही आकडेवारी जी-7 देशांच्या मतदारांच्या १.५ पट आणि २७ युरोपियन युनियन देशांमधील मतदारांच्या 2.5 पट आहे.
यावेळी राजीव कुमार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 31.2 कोटी महिलांसह 64.2 कोटी मतदारांच्या सहभागाने भारताने जागतिक विक्रम केला.जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 68,000 पेक्षा जास्त देखरेख टीम, 1.5 कोटी मतदान केंद्र आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता. यंदाच्या निवडणुकीसाठी सुमारे चार लाख वाहने, 135 विशेष गाड्या आणि 1,692 हवाई उड्डाणे वापरली गेली. २०१९ लोकसभा निवडणुकीत देभरात ५४० ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले होते. मात्र यंदा केवळ ३९ ठिकाणी फेरमतदान घ्यावे लागले. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये चार दशकांतील सर्वाधिक एकूण 58.58 टक्के मतदान झाल्याचेही त्यांनी सांगितले.