धरणगावात तालुकास्तरीय समितीची सभा संपन्न
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज– येथे काल तालुकास्तरीय पीक विमा समितीची सभा तहसिलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी धरणगाव तालुक्यातील एकूण ७००५ शेतकऱ्यांचे पिक विमा बाबत पंचनामे झाले असून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अथवा ऑफलाइन तक्रारी दाखल केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांचे नुकसान यादीतील नावे तपासून आयसीआयसीआय लोम्बार्ड या पिक विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खाती २८ जानेवारीपर्यंत पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्याचे पिक विमा प्रतिनिधी सागर पाटील यांनी सभेमध्ये सांगितले तसेच तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मार्चअखेर रक्कम कंपनीकडे प्राप्त होताच त्यांनाही याबाबत लाभ मिळणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी यानंतर पिकाचे नुकसान असल्यास ७२ तासाच्या आत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा सदर कंपनीकडे ऑनलाईन तक्रार दाखल करणे अनिवार्य असल्याची माहिती विमा प्रतिनिधी यांनी दिली.
या प्रसंगी गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री संजय देशमुख तालुका कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी संजय कोळी तसेच शेतकरी प्रतिनिधी तथा पंचायत समिती सभापती श्री प्रेमराज पाटील,सचिन पवार पंचायत समिती सदस्य धरणगाव,मुकुंद नन्नवरे माजी पंचायत समिती सभापती धरणगाव हे हजर होते. याप्रसंगी कोणत्याही शेतकऱ्याला पीक विम्यापासून वंचित ठेवू नये अशा सूचना सचिन पवार यांनी दिल्या. तसेच ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे अद्यापही झाले नसतील ते तात्काळ पूर्ण करावेत अथवा ईपिक पाहणी वरून त्याबाबत माहिती घ्यावी अशा सूचनाही दिल्या.
सद्यस्थितीत कापूस मूग ज्वारी तसेच रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हाती लागलेला नसल्याने याबाबत उचित कारवाई करण्याचे निर्देश प्रेमराज पाटील यांनी दिले.या सभेला दोनगांव, एकलग्न येथील तक्रारकर्ते शेतकरीही हजर होते.
याप्रसंगी संजय कोळी यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली.