जळगाव : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५७.७०, तर रावेरसाठी ६३.५७ टक्के मतदान झाले. अंतिम टक्केवारीत यात आणखी काही वाढ होऊ शकते. दरम्यान, दोन्ही मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. एरंडोलमध्ये मतदानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाविरुद्ध तर दारूच्या नशेत आढळणाऱ्या मलकापूर मतदार केंद्र प्रमुखाविरोधात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील रामदेववाही येथे दुचाकीवरील चारजणांना भरधाव कारने उडविल्याच्या घटनेनंतर आरोपींवर गंभीर कारवाई न झाल्याने त्याचे पडसाद जामनेर, चाळीसगाव व जळगाव तालुक्यात उमटले आहेत. रामदेववाडीतील बंजारा समाजाने मतदानावर बहिष्कार टाकल्याची बातमी कळताच या दोन्ही मतदारसंघांतील बहुतांशी समाजबांधवांनी मतदानाकडे पाठ दाखविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.