नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील ९ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. याशिवाय आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभा जागांवर आणि ओडिशाच्या 28 विधानसभा जागांवरही मतदान होत आहे.
पश्चिम बंगालमधील बोलपूर येथे मतदानाच्या एक दिवस आधी रात्री उशिरा एका TMC कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. टीएमसीने सीपीआय(एम) समर्थकांवर बॉम्बस्फोटांचा आरोप केला आहे. दुर्गापूरमध्ये भाजप आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. बीरभूममध्ये भाजपने टीएमसी समर्थकांवर स्टॉलची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, बिहारच्या मुंगेरमध्ये मतदानापूर्वी एका पोलिंग एजंटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंगेरमध्येच मतदानादरम्यान स्लिप न दिल्याने काही लोकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज करून दोन तरुणांना ताब्यात घेतले.
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून एक व्हिडिओ समोर आला आहे. येथे वायएसआर काँग्रेसचे आमदार अण्णाबथुनी शिवकुमार यांनी एका मतदाराला थप्पड मारली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मतदारानेही थप्पड मारली. यानंतर आमदार समर्थकांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. रांगेत न आल्याने त्या व्यक्तीने आमदाराला अडवले होते, त्यामुळे वाद झाला. सकाळी 11 वाजेपर्यंत लोकसभेच्या सर्व जागांवर 24.87 टक्के मतदान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 32.78% आणि सर्वात कमी जम्मू आणि काश्मीरमध्ये 14.94% मतदान झाले. याशिवाय आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत 23.00% आणि ओडिशामध्ये 23.28% मतदान झाले आहे. 2019 मध्ये भाजपने 42, वायएसआर काँग्रेस 22, BRS 9 आणि काँग्रेस 6 जागा जिंकल्या होत्या. इतरांना 17 जागा मिळाल्या होत्या. चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर लोकसभेच्या 543 जागांपैकी 380 जागांवर मतदान पूर्ण होणार आहे. यानंतर 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी 163 जागांवर मतदान होणार आहे. निकाल 4 जून रोजी आहे.