एरंडोल : प्रतिनिधी
‘मदर्स डे’च्या दिवशीच मुलगा आणि सुनेने मिळून आईचा दगडाने ठेचून खून केला. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना एरंडोल येथील केवडीपुरा भागात रविवारी पहाटे घडली. प्लॉट विक्रीच्या वादातून हा प्रकार घडला. मुलगा आणि सुनेस अटक करण्यात आली आहे. विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) (६०) असे या मृत महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विमलबाई यांच्या घराशेजारी त्यांच्या नावे असलेला प्लॉट मुलगा बापू मोहिते (४०) व सून शिवराबाई मोहिते (३५) यांना विकायचा होता. परंतु यास विमलबाईंचा विरोध होता. त्यामुळे मुलगा आणि सून त्यांना त्रास द्यायचे त्यामुळे विमलबाई ह्या मुसळी (ता. धरणगाव) येथे गेल्या होत्या. समाजातील काही लोकांनी मुलगा व सुनेची समजूत घातली आणि विमलबाई यांना एरंडोल येथे एकत्र राहण्यास राजी केले. रविवारी पहाटे साडेतीन वाजता मुलगा आणि सुनेने दगडाने ठेचून विमलबाई मोहिते यांचा निघृण खून केला. या घटनेबाबत मृत महिलेच्या बहिणीच्या मुलाने फिर्याद दिली. त्यावरून एरंडोल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यात वापरलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे.