जळगाव : विजय पाटील
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रावेर मतदार संघात मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात यावर सर्वांचे लक्ष आहे. एकीकडे राजकारणात नवखे असलेले उद्योजक श्रीराम पाटील तर दुसरीकडे मागील दहा वर्षांपासून खासदार असलेल्या एका मोठ्या राजकीय परिवाराच्या सून रक्षा खडसे आहेत. केळी, कापूस ही महत्त्वाची पिके घेणारा रावेर मतदार संघ रेल्वे, ऑर्डीनंस फॅक्टरी यांच्या साठी सुध्दा प्रसिद्ध आहे. मागील दहा वर्षांच्या कालखंडात मतदार संघातून सुरू झालेली हॉर्टीकल्चर ट्रेन बंद झाली, रावेर रेल्वे स्थानकात अनेक गाड्यांचा थांबा बंद झाला, राजधानी होती एक्स्प्रेसला जळगांवला थांबा मिळाला परंतु देशातले मोठे जंक्शन असलेले भुसावळ येथे थांबा नाही, पर्यटन विकासाचा कोट्यवधीचा हरताळा क्लस्टर कागदावर आला कोट्यवधी रुपयांचे ठेके दिले आणि तोही कुठे मुरला कळले नाही याचं प्रमाणे बोदवड, मेगा रिचार्ज, असे अनेक प्रकल्प रखडले किंवा कोट्यवधी रुपये खर्च केले असे कागदावर दिसते.
परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. तुलनेत श्रीराम पाटलांनी एका गॅरेज मेकॅनिक पासून सुरुवात करीत स्वतः चे उद्योग विश्व तयार केले अनेकांच्या हातांना काम दिले, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अल्प दरात ठिबक उपलब्ध करून दिले, रावेर मधून जाणाऱ्या महामार्गाची स्वखर्चाने डागडुजी केली, सामाजिक उपक्रमांना त्यांची सढळ हाताने मदत असते. यामुळे लेवा समाज सुद्धा त्यांच्या प्रेमात आहे. असो पण आज मतदार संघात शेती, शेतीपूरक उद्योग, रोजगार, पिण्याचे पाणी अशा अनेक स्थानिक समस्या आहेत. एकीकडे राष्ट्रीय मुद्यांवर काम करणारे पंतप्रधान आहेत परंतु दुसरी कडे स्थानिक पातळीवर मात्र खासदारां बाबत खूपच नाराजी दिसते. जातीय समिकरणाचा विचार करता सर्वात मोठा मराठा समाज आहे जवळपास पाच लाखांच्यावर मराठा मतदार आहेत तर दोन ते अडीच लखांदरम्यान लेवा पाटील समाज, सत्तर ते ऐंशी हजार गुजर समाज आहे. यात मराठा समजा नंतर संख्येने अधिक मुस्लिम आणि दलीत समाज आहेत. त्यांचे अतित्व डावलून ही निवडणूक जिंकता येणार नाही. आज पर्यंत रवींद्र पाटील यांचा अपवाद वगळता लेवा विरुद्ध लेवा अशीच निवडणूक झाली आहे. यापूर्वी सात वेळा रावेर लोकसभा मतदार संघात लेवा उमेदवारच खासदार राहिले आहेत. अर्थात मराठा बहुल असतानानाही मोठ्या पक्षांनी तुलनेनं लहान असलेल्या समाजाला उमेदवारी दिली आणि मराठा समाजानेसुद्धा मोठ्या भावाचे औदार्य दाखवीत लेवा उमेदवार निवडून दिला. परंतु मागील दहा वर्षांत मतदार संघाचा शून्य विकास आता कुठेतरी मतदारांच्या मनात परिवर्तनाची अशा तर निर्माण करीत नाही ना ? असा प्रश्न निर्माण होतो. ते काहीही असले तरी आता या मतदार संघात मराठा विरुद्ध लेवा हा संघर्ष उमेदवार एकमेकांसमोर शद्दू ठोकून उभे आहेत. जातीय समिकरणाचा विचार करता आता मराठा , मुस्लिम आणि नवबौद्ध हेच विजय निश्चित करतील यात शंका नाही. वरकरणी सोपी वाटणारी निवडणूक नवख्या परंतु सचोटीने आपले उद्योगविश्र्व निर्माण करणाऱ्या श्रीराम पाटलांनी खडसे परिवारासाठी कठीण करून ठेवली आहे. मराठा समाजाचे काही लोक याला अस्तित्वाची तर इतर समजतील याला परिवर्तनाची निवडणूक म्हणून पाहत आहेत. श्रीराम पटलांसाठीची निवडणूक आता नेत्यांऐवजी जनतेनेच हाती घेतली आहे असे चित्र तरी दिसून येत आहे. रक्षा खडासेंसाठी दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या परंतु त्यांनी मोदींवर बोलणे जात पसंत केले. परंतु श्रीराम पटलांसाठी लोक स्वतः हून प्रचार करीत आहेत. या निवडणुकीत नेते विरुद्ध जनता असे सुद्धा पाहायला मिळत आहे. जे नेते माझ्याकडे इतक्या लोकांचा पाठिंबा आहे अशा वल्गना करीत आहेत ते सपशेल घरात बसले आहेत आणि जनता आता रस्त्यावर उतरली आहे. या नेत्यांकडून दगा फटका झाल्यास जनता या नेत्यांना जाब विचारायला कमी करणार नाही याचे उदाहरण कोचुर सारख्या अनेक गावांत पाहायला मिळते. मुक्ताईनगरमध्ये परिवर्तन झाल्यावर विकास कामे दिसू लागली असे तेथील जनतेचे म्हणणे आहे. म्हणून परिवर्तनाची नांदी लोकसभेतही दिसेल का ? हा प्रश्न समोर येतो. असो राजकारण म्हंटले की सर्व आलेच परंतु एक मात्र नक्की यावेळी मतदार संघात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. येणारा निकालच सांगेल की रावेर मतदार संघात घराणे जिंकते की कर्तृत्व सिद्ध केलेला उद्योजक.