बीड : वृत्तसंस्था
शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे असो की आणखी कोणी पुढे येत असतील, तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. मनोज जरांगे-पाटील यांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे या जिल्ह्यात येऊन जरांगे-पाटलांना भेटलो. त्यांना एक विनंती केली की, या राज्यात कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थितीत येथे प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, फौजिया खान, आ. राजेश टोपे, आ. संदीप क्षीरसागर, उमेदवार बजरंग सोनवणे, माजी आ. उषा दराडे साहेबराव दरेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी शरद पवार म्हणाले, देश नरेंद्र मोदींच्या हातात आहे. अनेक भाषणे करतात. मात्र शेतमालाला किंमत नाही. सर्व देशातील सत्ता हातात आहे, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वापरली नाही. नरेंद्र मोदींचे सरकार हे शेतकरी विरोधी असून त्यांच्या हातात पुन्हा सत्ता देऊ नका. या सरकारला शेतकऱ्यांचा हिसका दाखवून द्या, अलीकडे दडपशाही सुरू झाली आहे. सत्ता यांच्या इतकी डोक्यात गेली आहे की कोणी टीका केली तर त्यांना सहन होत नाही. यामुळे मोदींना मदत होईल, असे काम मतदानातून करू नका, असे आवाहनही पवार यांनी केले.