जळगाव : प्रतिनिधी
आपसामध्ये सुरू असलेल्या गंमतबाजीवरून वाद उद्भवला आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकेश विजयसिंग राजपूत (१९, रा. आशाबाबा नगर) या विद्यार्थ्याची कॉलर पकडून त्याच्यावर चाकूने वार केला. ही घटना बुधवार, ८ मे रोजी मू.जे. महाविद्यालयाजवळील एका बेकरीजवळ घडली. याप्रकरणी ९ मे रोजी रामानंद नगर पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा लोकेश राजपूत हा विद्यार्थी बुधवार, ८ मे रोजी सकाळी उभा होता. त्याच्या बाजूला काही तरुणांमध्ये गंमतबाजी सुरू होती. त्यावरून त्या तरुणांमध्ये लोटालाटी झाली. त्यावेळी काहीही कारण नसताना तरुणांनी लोकेशची कॉलर पकडली. कॉलर का पकडली म्हणून त्याने विचारणा केली असता कल्पेश पाटीलसह त्याचा भाऊ आणि सोबत असलेल्या एकाने लोकेशवर चाकूने वार दुखापत केली. जखमी लोकेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी कल्पेश पाटीलसह त्याचा भाऊ आणि सोबत असलेला एक जण अशा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.