जळगाव : प्रतिनिधी
माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी बुधवारी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला. भविष्यात राष्ट्र, राज्य, जिल्हा व जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक भूमिकेत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुरुवारी जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सुरेशदादा जैन यांनी ही घोषणा केली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त केले आहे. सुरेशदादा जैन हे १९७४ पासून राजकारणात होते. ते १९८० मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि सलग ३४ वर्षे आणि नऊ वेळा आमदार होते. ते १९८५ मध्ये जळगावचे नगराध्यक्ष, तर १९९५ मध्ये राज्यातील युती सरकारमध्ये मंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वात झालेला जळगाव शहराचा सर्वांगीण विकास, विशेषतः बीओटी तत्त्वावर बांधलेली संकुले, गोरगरिबांसाठी घरकुले आदी कामांमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभावित झाले होते.