जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात सर्वत्र सामूहिक रित्या अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. या वर्षी १० मे रोजी अक्षय तृतीया असून या दिवशी शुभ मुहूर्त समजले जाते त्या दृष्टीने या दिवशी बालविवाह होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणा सतर्क राहून असे होणारे बालविवाह थांबविण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले . बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ संपूर्ण राज्यात लागू केला आहे. त्याचप्रमाणे त्या बाबतचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २०२२ देखील लागू आहे. या नियमानुसार ग्रामसेवक यांना ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक आधिकारी तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे, आणि सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, शहरी भागात पर्यवेक्षीका यांना घोषित केले आहे.
सर्व यंत्रणांनी ह्या दिवशी आपले कर्तव्ये जबाबदरीने पार पाडावे. कारण जर एका पुरुषाचा विवाह बालवधू (१८ वर्षाखालील) सोबत झाल्यास त्या पुरुषाला २ वर्ष सक्त मजूरी कैदी आणि १ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष सहकार्य करणारे व्यक्ती, लग्नास सुविधा पुरवणारे घटक (पुजारी,आचारी,मंडप, केटरर्स, मुलाचे व मुलीचे नातेवाईक, मित्र मंडळी, प्रिंटींग प्रेस मालक तसेच इतर सेवा पुरवणारे घटक, लग्नात उपस्थित सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल होऊ शकतो. सोबतच ग्रामपंचायत मधून जन्मदाखल्याची खोटी नोंद दिल्याचे आढळल्यास ग्रामसेवकावर देखील कारवाई होईल.
जिल्ह्यात कोठेही बालविवाह होत आहे असे समजल्यास १०९८ या टोल फ्री चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा. संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. असे आवाहन जिल्हाधिकारी जळगाव यांचेमार्फत करण्यात आले आहे.