जळगाव विजय पाटील : देशाची लोकसभा निवडणूक आता चौथ्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. रावेर मतदार संघात आपल्या सूनबाईंसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तुतारी सोडून कमळ हाती घेतले आहे. तसे खडसे हे राज्यातले मोठे तसेच कुठली गोष्ट लक्षात ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मधुकरराव चौधरी, हरीभाऊ जावळे, सुरेश जैन, संतोष चौधरी, अशा अनेक नेत्यांचे राजकारण संपविण्याचे काम खडसे यांनी केले हे सर्वश्रुत आहे. जिल्ह्यात खडसेंना जड गेले ते गिरीश महाजन. संघाच्या मुशीतून तयार झालेले स्वयंसेवक गिरीशभाऊ वेळोवेळी त्यांना पुरून उरले.
परंतु यावेळी खडसेंनी थेट दिल्ली गाठत सुनेचे तिकीट मिळविले. आपल्या जुन्या सहकाऱ्यांना जुन्या मैत्रीची आठवण करून देत सूनबाईच्या हातातून निसटलेले लोकसभेचे तिकीट मिळवून दिले. आता आपल्या सुनेचा प्रचार ते करतायेत. परंतु या सर्व घडामोडींमध्ये भा. ज. पा. चे संकट मोचक गिरीश महाजनांना मात्र डावलले गेल्याचे दिसून येते. त्यांना विश्वासात न घेता रक्षा खडसेंना तिकीट देण्यात आले. तसे अमोल जावळे, डॉ. कुंदन फेगडे यांसारखे कृतिशील, अभ्यासू, अनेक प्रश्नांची जाण असणाऱ्या, निरपेक्षपणे पक्षाचे काम करणाऱ्या तरुणांना सोडून कृतीहिन, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत हसणाऱ्या उमेदवारास पुन्हा तिसऱ्यांदा तिकीट दिले. इथे कुठेतरी जळगाव जिल्ह्यात सक्रिय राजकारण करणाऱ्या गिरीश भाऊंना डावलले गेले हे दिसून येते. वेळोवेळी खडसेंनी पक्षनिष्ठ गिरीश महाजनांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. स्वतः १२ खात्यांचे मंत्री झाले परंतु गिरीश महाजनांना लवकर मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न करणारे खडसेच होते. मागे गिरीश भाऊंची सी.डी. काढण्याची धमकी देत भा. ज. पा. च्या संकट मोचकाची अश्लील बदनामी करण्याचा प्रयत्न खडसेंनीच केला.
खडसे महाजन वाद सर्वांना माहीतच आहे. येणाऱ्या लोकसभेत जर खडसे त्यांच्या सूनबाईंना निवडून आणू शकल्यास त्यांचे पक्षातील स्थान आणि महत्त्व पुन्हा वाढेल. खडसे पुढे केंद्रीय राजकारणात रस घेऊन राज्यातील त्यांच्या वाटेतले गिरीश महाजन यांना संपविण्याचा प्रयत्न करतील हे वास्तव नाकारून चालणार नाही. कारण जिल्ह्यातली आणि राज्यातील खडसेंच्या राजकारणात सर्वात मोठा अडसर गिरीश महाजन ठरतात. म्हणून खडसे सर्वप्रथम गिरीश महजांना येनकेन प्रकारे राजकारणातून आणि आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न करतील हे निश्चित. महाजनां सोबत त्यांचे खंदे कार्यकर्ते रामेश्वर नाईक, यशवंत पाटील, अरविंद देशमुख यांच्यासारख्यांच्या मागे सर्वप्रथम चौकिशीचे जाळे आवळले जाईल आणि शेवटी गिरीश महाजांना अडकाविले जाईल हे निश्चित. खडसेंचे राजकारण संपल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होणे शक्य नाही कारण ते जिल्ह्याच्या विकासावर कमी आणि त्यांच्या वाटेत येणाऱ्या व्यक्तींवर अधिक लक्ष ठेऊन खेळी खेळतात. असो पण खडसेंच्या सुनबाई जर या निवडणुकीत जिंकल्या तर एकनाथ खडसे पुन्हा पुनरुज्जीवित होतील अर्थात त्यांचा पूनरउदय होईल आणि ते सर्व प्रथम गिरीश महाजनांना संपविण्यासाठी आपले शस्त्र बाहेर काढतील.
म्हणूनच भा. ज. पा. मध्ये खडसेंचा पूनरउदय म्हणजे संकटमोचक महाजनांच्या अस्ताची सुरुवात ठरू शकते. बाकी जनता हुशार आहे त्यांना खु…राजकारण हवे की प्रगती आणि उद्योगाची तुतारी…. हे येणारा काळच ठरवेल
आपला
रावेरकर मतदार