जळगाव : प्रतिनिधी
अंगणात उभ्या केलेल्या एका ईलेक्ट्रीक दुचाकीसह दोन दुचाकींना आग लागून त्या जळून खाक झाल्या. ही घटना रविवार मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव म्हसावद येथील योगेश रमेशचंद अग्रवाल (वय ४९) यांचा हलवाईचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांची (एमएच १९, डीझेड, ३६४६) इलेक्ट्रीक बाईक व दुसरी (एमएच १९, डीयू ९८३४) क्रमांकाची दुचाकी अंगणात उभी केली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक त्यांच्या दुचाकींनी आग लागून दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. मध्यरात्री दोन वाजता एका जणाने अग्रवाल यांना आवाज देऊन दुचाकी जळत असल्याची माहिती दिली. त्या वेळी त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता दोन्हीही दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. या आगीमुळे अंगणातील झाडही जळाले असून प्रवेशद्वाराजवळ लावलेले शोभेचे विजेचे दिवेही जळाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याविषयी काहाही समजू शकले नाही.