रावेर : प्रतिनिधी
पिकवलेल्या केळीला भाव न मिळाल्याने कर्जाच्या चिंतेत असलेल्या हर्षल रविंद्र नेहेते (वय ३८, रा. निंभोरा, ता. रावेर) या तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील निंभोरा येथील तरुण शेतकरी हर्षल नेहेते यांनी उत्पादन चांगले व्हावे व त्याचा मोबदला चांगला मिळावा. यासाठी शेतात केळीची लागवड केली होती. परंतु केळीला भाव न मिळाल्यामुळे तसेच त्यासाठी लागलेला खर्च देखील न निघाल्याने ते निराश होते. तसेच आर्थीक विवंचनेत असलेल्या नेहते यांना डोक्यावरील कर्जाची परतफेड कशी करावी या विंवचतनेतून सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हर्षल नेहते यांनी त्यांच्या शेत गट नं. ११७७ मध्ये पेरुच्या झाडला दोराच्या साहय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच सपोनि हरिदास बोचरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अविनाश पाटील, प्रभाकर धसाळ करीत आहे. हर्षल नेहते याच्या पश्चात पत्नी, आई, बहिण व पाच वर्षाची मुलगी असा परिवार आहे.