पाचोरा : प्रतिनिधी
बँकेतील बचत खात्यात ठेवलेल्या चार लाखांची ऑनलाइन चोरी झाल्याची तक्रार दुसखेडा (ता. पाचोरा) येथील शेतकऱ्याने सायबर क्राइम शाखेकडे दाखल केली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, अनिल तुकाराम महाजन (दुसखेडा, ता. पाचोरा) यांचे दोन बँकांमध्ये असलेल्या बचत खात्यातील रकमेची दि. ३ मे व ४ मे रोजी ऑनलाइन चोरी झाल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याबाबत सोमवारी त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, महाजन यांचे एका बँकेच्या बचत खात्यात २ मेपर्यंत २ लाख ८० हजार एवढी रक्कम होती, तर दुसऱ्या बँकेत २ लाखापेक्षा जास्त रक्कम होती. दि. ४ मे रोजी अनिल महाजन यांच्या बँकेशी जोडलेल्या मोबाइलवर खात्यातून रकमा काढल्याचा मेसेज आला. एका बँकेच्या खात्यातून दि. ३ मे रोजी दोन वेळेस प्रत्येकी ५० हजार काढल्याचा, तर दुसऱ्या बँकेच्या खात्यातूनदेखील त्याचदिवशी २ लाख रुपये काढल्याचा संदेश आला. सोमवारी त्यांनी सकाळीच खाते तपासले असता दि. ४ रोजीही १ लाख काढल्याचे बैंक अधिकाऱ्याने सांगितले.
दुसऱ्या बँक खात्यातून दोन लाख लंपास झाले. यामुळे शेतकऱ्याने सायबर क्राइम शाखेकडे तक्रार दाखल केली असून, शेतकरी अनिल महाजन यांची एकूण ४ लाखांची रक्कम अज्ञात चोरट्याने ऑनलाइन काढल्याचे तक्रारदाराने सांगितले. बँकेतील रकमा परस्पर काढल्याने बँक अधिकारीही संभ्रमात पडले आहेत.