पालकमंत्र्यांच्या हस्ते कुटुंब अर्थसहाय्य तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसांना मदत वाटप
धरणगाव प्रतिनिधी : आज अत्यंत विपरीत स्थिती असली तरी कुणी जीवन संपविण्याचा प्रयत्न करता कामा नये. दिवस हे परिक्षा घेणारे आणि संघर्षाचे असले तरी राज्य शासन हे शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत १५ महिलांना प्रत्येकी २० हजार रूपयांच्या सहायता धनादेशाचे वितरण आणि आत्महत्याग्रस्त ३ शेतकर्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये शासकीय मदतीने वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना तीन महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव तालुक्यातील १५ महिलांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण ३ लाख मंजूर प्रस्तावाचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यामध्ये मंगलाबाई पाटील बोरगांव बु;, सुनंदा संदानशिव अहिरे खुर्द, आशाबाई पाटील कल्याणे खुर्द, निंबाबाई पाटील वाकटुकी, जिजाबाई भिल बाभळे , तुळसाबाई पाटील चांदसर, पुनम गोसावी झुरखेडा, छाया भालेराव वाघळुद बुद्रुक; वसंताबाई पाथरवट वाघळुद खु,र्द; रंजना मोरे वाघळुद खुर्द; कविता पाटील वराड बुद्रुक; पुजा बाविस्कर साळवा, रिंकु भिल वराड बुद्रुक, अंजनाबाई पाटील पिंपळे खुर्द आणि सरला पाटील धरणगाव या महिलांना धनादेश प्रदान करण्यात आले.
याच कार्यक्रमात मौजे बोरखेडा येथील मयत शेतकरी कैलास धनसिंग पाटील त्यांचे वारस म्हणून पत्नी संजूबाई कैलास पाटील यांना, अतुल यशवंत देशमुख यांचे वारस पत्नी म्हणून रोहिणी अतुल देशमुख राहणार अनोरे यांना; किशोर सुरेश जाधव यांचे वारस पत्नी म्हणून ललिता किशोर जाधव राहणार पथराड बुद्रुक यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश व एक महिन्याचा किराणा व ब्लँकेट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी होत असून यात कोणत्याही घरातील कर्ता पुरूष गेल्यास यामुळे निर्माण झालेली पोकळी ही कुणीही भरून काढू शकत नसला तरी राज्य शासन हे मदतीच्या माध्यमातून आपल्या संघर्षाला हातभार लावते असे प्रतिपादन केले. शेतकर्यांनी निराश न होता, परिस्थितीशी दोन हात करावे असे आवाहन केले. राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी नमूद केले. तर राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेच्या अंतर्गत गरजू कुटुंबांना मिळालेल्या मदतमधून त्यांनी जीवनावश्यक आणि शक्यतो शिक्षणावर खर्च करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी एरंडोल विनय गोसावी , तहसीलदार नितीन कुमार देवरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे , प्रेमराजबापू पाटील, चर्मकार संघाचे भानुदास विसावे, चांदसर सरपंच सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते