चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील रोहिणी या गावात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निघृण खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. भारताबाई कैलास गायकवाड (३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती कैलास एकनाथ गायकवाड (३८, रा. ओझर, ता. चाळीसगाव) याला शनिवारी रात्रीच अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास हा पत्नी भारताबाई हिच्यावर संशय घेऊन वाद घालत होता, तसेच मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. या प्रकारास कंटाळून ती मुलगी योगिता हिच्यासोबत माहेरी रोहिणी येथे निघून आली होती. त्यानंतर, दोन-तीन दिवसांपूर्वी भारताबाई हिच्या वडिलांनी जावई कैलास याला घरी बोलावून घेतले. त्यावेळी परिवारातील सर्वांनी त्याची समजूत काढत रोहिणी येथेच राहण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे तो तिथेच राहू लागला.