नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीच्या घटकपक्षांमध्ये निर्माण झालेला गुंता सुटला आहे. नाशिकमधून महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना रणांगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळं नाशिकमधील प्रमुख लढतीचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती.
अशामध्ये अखेर एका महिन्यानंतर या जागेवरून नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपावरून महायुतीमध्ये असलेला तिढा अखेर सुटला. महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. तब्बल एका महिन्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले.
शिवसेना पक्षाकडून सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करत हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या पोस्टमध्ये पक्षाकडून असे लिहिण्यात आले आहे की, ‘लोकसभा निवडणूक – २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.’ या पोस्टद्वारे पक्षाकडून हेमंत गोडसे यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.
हेमंत गोडसे हे गेल्या १० वर्षापासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आता त्यांना तिसऱ्यांदा पक्षाकडून संधी मिळाली आहे. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. हेमंत गोडसे यांनी मंगळवारी रात्रीच गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. आता उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख लढत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये होणार आहे.