पाचोरा : प्रतिनिधी
भाग्यश्री हॉलिडे ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटकडून नगरदेवळा येथील यात्रेकरूंची फसवणूक केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रघुनाथ सुखदेव सोनार (७०, नगरदेवळा, ता. पाचोरा) या यात्रेकरूने दक्षिण भारत यात्रेसाठी भाग्यश्री हॉलिडे, मालाड-मुंबई या कंपनीचे एजंट भूपेश भीमभाई सुरती (मालाड) यांच्याशी जाहिरातीवरून ऑनलाइन बुकिंगसाठी संपर्क केला.
भूपेश सुरती हा नगरदेवळा येथे येऊन त्याने १७ ऑक्टोबर रोजी रघुनाथ सोनार याच्यासह बारा यात्रेकरूंशी संपर्क केला व आरक्षणासाठी पैशाची मागणी केली. या यात्रेकरूंनी १७ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर २३ दरम्यान वेळोवेळी ऑनलाइन बैंकिंगद्वारे भूपेश भीमभाई सुरती याच्या अकाउंटवर एकूण २ लाख १३ हजार रुपये टाकले. त्यानंतर भूपेश सुरती याने कोणत्याही प्रकारचा संपर्क न ठेवता नियोजित दक्षिण भारत यात्रेसाठी या यात्रेकरूंना भूलथापा देणे सुरू केले. अनेकवेळा हाच प्रकार झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनार यांनी पाचोरा पोलिसांत धाव घेत भाग्यश्री हॉलिडे या ट्रॅव्हलिंग एजन्सीचा एजंट भूपेश सुरती याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पाचोरा पोलिस करत आहेत.