लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात सुरू झाला आहे. अर्थात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आता तिच्या मधल्या टप्प्यावर आहे. रावेर मतदार संघातील निवडूनिकाचा ज्वर वाढत आहे. एकीकडे माजी मंत्री व विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे विरुद्ध उद्योजक श्रीराम पाटील असा थेट सामना रंगणार आहे. परंतु हा सामना अधिक नाट्यमय होतोय तो एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यावरून. अर्थात मूळचे काँग्रेसी नंतर भारतीय जनता पक्षात अनेक वर्षे कार्य केलेले तब्बल १२ खात्यांचे मंत्री असलेले खडसे स्वपक्षियांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून भा. ज. पा. ला राम राम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कन्या रोहिणी सोबत दाखल झाले. आता नाथाभाऊंचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे खरे कारण स्वपक्षीय होते की भोसरी जमीन घोटाळा की, अन्य काही हे सर्व केवळ नथाभाऊ यानाच माहित. असो पण आता सून रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर करताच भाऊंनी आवई उठवली की ते पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. निवडणुका तिसऱ्या टप्प्यात आल्या तरीही भाऊंनी काही पक्ष प्रवेश केला नाही की पवार सहेबांनी सुद्धा एवढ्या मोठ्या घटनेची दखल घेत खडसेंची आमदारकी रद्द करीत त्यांना बाहेर काढले नाही. यात अजून एक ट्विस्ट असा की कन्या रोहिणी अजूनही पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत कारण त्यांना मुक्ताईनगर मधून विधानसभा लढवायची आहे. असो पण एकनाथ खडसे खूपच मुरब्बी राजकारणी आहेत मध्येच ते त्यांना कोण्या भाईची धमकी आली असे सांगतात आणि संपूर्ण मीडिया आणि पोलीस दल हलवून सोडतात. आता याचे खरे कारण सर्वांना माहीत आहे. सर्व कळून सुद्धा पोलीस तातडीने त्यांना सुरक्षा पुरवितात. आता या सर्व घटनेत एकनाथ खडसे पुन्हा चर्चेत आणि बातम्यांमध्ये येतात हे मात्र नक्की. पुन्हा भाऊंनी बॉम्ब फोडला आत मी राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचा राजीनामा दिला असून आता मी सूनाबईंचा प्रचार करण्यासाठी मुक्त आहे. राजीनाम्याची प्रत ते कोणालाच दाखवत नाहीत की त्यांच्या पक्षाकडून अधिकृत असे काहीच वक्तव्य नाही. या सर्व घटनांवरून खडसे साहेब रावेर मतदार संघातील जनतेला बहुदा मूर्ख तरी समजतात किंवा सर्व काही आपणच असे तरी समजतात. भाऊ एकीकडे लोकसभेत सुनेचा प्रचार करायचा आणि लोकसभा संपली की लगेच म्हणायचे मला अजूनही भा. ज. पा. मध्ये घेतले नाही म्हणून मी राष्ट्रवादी मध्येच राहतो आणि मग विधानसभेत मुलीचा प्रचार करायला मोकळे. म्हणजे एका राजीनाम्यात (जो बहुदा दिलाच नाही) सून खासदार, मुलगी आमदार आणि स्वतः तर विधानपरिषदेत आहेतच म्हणजे दोन आमदारकी आणि एक खासदारकी घरातच ठेवायची. म्हणजे इतरांना काहीच मिळू नये मी आणि माझा राजकीय व्यवसाय मस्त चालवायचा. आणि यांना मदत करणार ते सर्व राजकीय परिवार मग ते राष्ट्रवादीचे दोन्ही गट, शिवसेना असोत की भा.ज.पा. या सर्व पक्षांतील राजकीय परीवरांना सत्ता आपापल्या हातातच ठेवायची आहे. श्रीराम पाटील, निलेश लंके यांच्या सारखे सामन्यांतून असामान्य कर्तृत्व दाखवून पुढे आलेले उमेदवार यांना नको आहेत. वर्षानुवर्षे राजकीय दुरदृष्टीच्या अभावामुळे भकास होत चाललेल्या रावेर मतदार संघास श्रीराम पाटील यांच्यासारखा भूमिपुत्र उद्योजक ज्यांना विकासाची खरी दृष्टी आहे असे उमदा उमेदवार मिळाले आहेत. रावेर मतदार संघातील जनता जर सुज्ञ असेल तर त्यांनी खडसेंच्या नाट्यला बळी न पडता ठोस निर्णय घ्यावा आणि दृष्टिहीन, कावेबाज खडसेंना आता बाहेरचा रस्ता दाखवावा. कारण याच खडसेंनी त्यांच्याच लेवा समाजातून एकही नेतृत्व एकतर उदयास येऊ दिले नाही किंवा बहरू दिले नाही. त्यांच्या पारिवारिक सेटलमेंटचे मोठे बळी हरिभाऊ जावळे आहेत. अतिशय मित भाशी लोकांसोबत नाळ जुळवून ठेवणाऱ्या हरिभाऊंना खडसेंनी आपल्या सूनेसाठी लोकसभेचे तिकीट मिळू दिले नाही त्यावेळी हरीभाऊंना तिकीट मिळाले असते तर ते केंद्रीय मंत्री झाले असते. परंतु संघाच्या मुशीत तयार झालेल्या हरीभाऊंनी पक्षादेश मनात लोकसभा सोडली आणि विधानसभा लढून ते आमदार झाले. जेंव्हा त्यांना राज्याचा कृषी मंत्री करायचे ठरले तेंव्हा पुन्हा खडसे मध्ये आले आणि हरीभाऊंचे मंत्री पद गेले. या घटनेवरून एकच कळते खडसेंना जाती पेक्षाही त्यांचे कुटुंब प्रिय आहे. त्यांना शक्य झाले तर ते त्यांच्या नातवांना सुद्धा आमदार करतील. असो पण एक मात्र नक्की खडसे कुणाचेच नाही त्यांना केवळ सत्ता उपभोगायची आहे. आणि सर्व पदे आपल्या घरात ठेवायची आहे. अशी राजकीय घराणी राज्यात एक सरंजामी व्यवस्था निर्माण करीत आहेत आणि त्यांच्या या सरंजामी व्यवस्थेचे बळी ठरतायेत ते सामान्य नागरिक. म्हणून रावेरच्या मतदारांनो जागृत व्हा आणि या खडसे नावाच्या सरंजामीला नष्ट करा.
तुमचा
रावेरकर मतदार